वाशिम : नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून, त्या अनुषंगाने गावोगावी तसेच शाळा, अंगणवाडी केंद्रांतील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील जवळपास २.९० लाख मुला-मुलींना गोवर, रुबेला लसीचा डोज दिला जाणार आहे. गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण तसेच शिक्षण विभागाचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने गावपातळीवरील कर्मचाºयांच्यावतीने शाळा, अंगणवाडी तसेच गावोगावी सर्वेक्षण करण्यात आले. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटात गोवर, रुबेलाची प्रकरणे आढळुन येतात. गोवर या आजारामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुला-मुलींच्या शरीरात व्हिटॅमीन ए ची कमतरता जाणवते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे डायरीया, न्युमोनीया, कुपोषण आदी आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संपूर्ण बालकांचे लसीकरण होेणे गरजेचे आहे. नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणा-या या मोहीमेदरम्यान ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना गोवर, रुबेला लसीचा पहिला डोज देण्यात येईल. ११४५ अंगणवाडी केंद्र आणि १३६५ शाळांमधील जवळपास २.९० लाख मुला-मुलींना ही लस दिली जाणार आहे. शाळाबाह्य मुला-मुलींनादेखील गोवर, रुबेला लसीचा डोज दिला जाणार आहे. विविध टप्प्यात प्रशिक्षणगोवर, रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने तालुका तसेच जिल्हास्तरावर विविध टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेमध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, एकात्मीक बालविकास प्रकल्प आदींचा समन्वय राहणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाशिम जिल्ह्यात २.९० लाख मुला-मुलींना दिली जाणार ‘रुबेला’ लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:32 PM