लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : क्रीडा विभागाच्या शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू आदी पुरस्कारांच्या नियमावलीमध्ये सुधारणा होणार असून, त्याअनुषंगाने खेळाडू, संघटना, नागरिकांकडून २२ जानेवारीपर्यंत सूचना व अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी दिली.खेळाडू, प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल आणि कौतुकाची थाप म्हणून क्रीडा विभागातर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीत सुधारणा करण्याचे प्रस्तावित असून, खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून २२ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सूचना व अभिप्राय मागविले आहेत. वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षक, खेळाडूंना यापूर्वी क्रीडा पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कारांच्या नियमावलीमध्ये सुधारणा होणार असल्याने जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक व क्रीडा संघटनांनी क्रीडा विभागाच्या इ-मेलवर सूचना किंवा अभिप्राय पाठवावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे उप्पलवार यांनी सांगितले.
क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत होणार सुधारणा; अभिप्राय मागविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:19 PM