दुसरीकडे मात्र यंत्रणेतील जबाबदार काही पोलीस कर्मचारी वाहने चालवत असताना मोबाइलवर संभाषण करण्यासह हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करत नसल्याचे दिसून आले. अशा स्थितीत वाहतूक नियम पाळण्याबाबत नागरिकांकडून कशी अपेक्षा करणार आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाचे अपेक्षित फलित काय निघणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
.................
बॉक्स :
पोलीस दुचाकीने तोडले दोन नियम
‘वाशिम पोलीस’ असे लिहून असलेले एम.एच. ३७ एक्स ६८२४ या क्रमांकाचे दुचाकी वाहन शहरातील पुसद नाका येथून रविवारी दुपारी १२.१७ वाजेच्या सुमारास शेलूबाजार रस्त्याने जात होते. वाहनावर असलेल्या दोघांनीही हेल्मेट परिधान केलेले नव्हते. याशिवाय चालू वाहनावर मोबाइलवर संभाषणही करण्यात आल्याचे दिसून आले.
....................................
पोलीस चारचाकीला नियम नाही
वाशिम शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या पोलीस पेट्रोलपंपातून रविवारी दुपारी १२.४६ वाजता डिझेल भरून निघालेल्या शहर पोलिसाच्या चारचाकी वाहनास मागून क्रमांक नसल्याचे दिसून आले. याशिवाय चालक कर्मचाऱ्याने सीटबेल्ट परिधान केलेला नव्हता. यावरून पोलिसांच्या चारचाकी वाहनाला नियम नसतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
..................
आरटीओ वाहनाचीही तीच गत
वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत मालेगाव टी पॉईंट कारंजानजीक महामार्गावरील मुख्य चौक आदी ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे वाहन अधूनमधून उभे असते. हे वाहनही वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याचे पाहावयास मिळाले.
.................
पोलीस प्रमुख
सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमाचे धडे देत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तेव्हाच नागरिक ही बाब सकारात्मकतेने स्वीकारतील. यासंबंधीच्या कडक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या जातील. रस्ता सुरक्षा अभियानाची वाशिम पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- धृवास बावनकर
पोलीस निरीक्षक, वाशिम शहर पोलीस ठाणे
..................
आरटीओ अधिकारी
३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून अंमलबजावणी केली जात आहे. या विभागाच्या वाहनांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास ही बाब गंभीर आहे. सखोल चौकशी करून कर्मचाऱ्यांना समज दिली जाईल.
- ज्ञानेश्वर हिरडे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम