वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात कार्यरत आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या अफवांमुळे लसीकरणावरही परिणाम दिसून येत आहे.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययाेजना केल्या जात आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापराबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काेराेनाकाळात सध्याच्या घडीला लस प्रभावी असून, लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहरात माेठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असताना ग्रामीण भागात मात्र लसीमुळे विविध आजार उद्भवतात, मृत्यू ओढवताे, लसीमुळेच ताप येऊन काेराेना हाेताे, बुरशीजन्य आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याच्या अफवा पसरत आहेत. आराेग्य विभागातर्फे गावागावांत लसीकरण काेराेनावर उपाययोजना करून, जास्तीत जास्त नागरिकांनी करून घेण्याचे आवाहन केले जात असताना याकडे ग्रामीण भागातील नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
....................
काय आहेत अफवा
काेराेना संसर्ग हाेताेय
ग्रामीण भागात सर्वात जास्त काेणत्या अफवेला पेव फुटले असेल तर लस घेतल्यानंतरच काेराेना संसर्ग हाेताे. यामध्ये सर्वाधिक वृध्द लाेकांचा समावेश असल्याचे दिसून आले.
मृत्यू ओढावताेय
लस घेतल्यानंतर काही जणांनाच ताप येत असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात काेराेना लस घेतल्यानंतर ताप येताेच व त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हाेत असल्याची काही जण चर्चा करताना दिसून येत आहे.
बुरशीजन्य आजार उद्भवताे
लसीकरणामुळे बुरशीजन्य आजार उद्भवत असल्याची चर्चा ग्रामीण भागात हाेत आहे. मला काहीच झाले नाही, आणि हाेणार नाही असे सांगून काही ग्रामस्थ लसीकरण करून कशाला आजार गळ्यात घ्यायचे, अशी चर्चा करीत आहेत.
...............
गावकरी संभ्रमात
लस घेतल्यानंतर विविध आजार होत असल्याची चर्चा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. यामुळे गावकरीसुध्दा संभ्रमात दिसून येत आहेत. यासंदर्भात काही गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता यावर काेणीही बाेलायला तयार नाही. आम्ही लस घेतल्याचे सांगत आहेत. काही जण तर लसीकरणाबाबत काहीही बाेलण्याचे टाळत आहेत.
............
ग्रामीण भागात लसीकरणामुळे विविध आजार होत असल्याची चर्चा, अफवा पसरत असली तरी लसीकरणच काेराेनावर प्रभावी उपाय आहे. लसीकरणामुळे अनेक जणांचा काेराेनापासून बचाव झाला आहे. नाहक अफवा पसरविणे गुन्हा आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व इतरांना परावृत्त करणे म्हणजेच काेराेना संसर्ग राेखणे शक्य होेईल.
- डाॅ. मधुकर राठाेड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम