सध्या संपूर्ण देशात गंभीर स्थिती आहे, रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या संपूर्ण शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड भरलेले असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, अनेकवेळा रुग्ण बेड शोधता शोधता गंभीर होत आहे. ज्या रुग्णाला तत्काळ भरती होण्याची गरज असते त्या रुग्णाला बेड मिळविण्यात वेळ वाया जात असल्याने त्रास होत आहे. रुग्णसेवा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असल्याने संपूर्ण परिसरातील गोरगरीब जनता रुग्णसेवा ग्रुपशी संपर्क करत असते आणि रुग्णसेवा ग्रुपच्या सदस्यांना सुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉल करून बेडची चौकशी करून रुग्णाला बेड मिळवून द्यावा लागतो, यात जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन शासनमान्य सरकारी व खासगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध बेडच्या माहितीसाठी हेल्पलाइन कक्ष व बेड मिळवून देण्यासाठी विशेष व्यवस्था सुरू करण्याची मागणी रुग्णसेवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके यांच्यासह ग्रुपचे सहकारी संतोष लांभाडे, सुरेंद्र राऊत, शुभम डोफेकर, राम सुर्वे यांनी केली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून एक ऑनलाइन साइट देण्यात आली आहे. ज्यावर बेडची उपलब्धता समजते; परंतु ती साईट गोरगरीब जनतेला कळणे अवघड आहे व त्या साइटवर माहिती सुद्धा वेळोवेळी अपडेट्स होत नाही. म्हणून विशेष व्यवस्था सुरू करण्याची मागणी होत आहे.
बेडसाठी धावाधाव; हेल्पलाइन कक्ष सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:42 AM