वाशिम : आग लागल्याने धावती खासगी बस जळून खाक झाल्याची घटना ११ मे रोजी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास वाशिम शहराला लागून असलेल्या काकडदाती फाट्याजवळ घडली. बसला आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस नांदेडवरून वाशिममार्गे नागपूरकडे ११ मे रोजी पहाटेच्या सुमारास जात होते. वाशिम येथून पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास शहराला लागून असलेल्या काकडदाती फाट्याजवळ पोहोचताच, धावत्या बसमध्ये अचानक आग लागल्याची बाब चालकाच्या लक्षात घेता. प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबविली आणि तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले.
या घटनेची माहिती वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला प्राप्त होताच, तातडीने घटनास्थळ गाठून आग विझविण्याला सुरूवात केली. मात्र, तोपर्यंत आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही आग शाॅक सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहाणी टळली; परंतू आगीत संपूर्ण बस जळून खाक झाल्याचे मोठे नुकसान झाले.