लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ा तील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणार्या उमेदवाराला अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसाठी अर्ज केल्याची पोहोच पावती जोडावी लागणार असल्याने, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अर्जासाठी इच्छुकांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणार्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दिग्गजांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्हय़ातील २८७ ग्राम पंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे; मात्र कारंजा तालुक्यात खेर्डा कारंजा, वालई, जांब, गिर्डा या चार ग्रामपंचायतची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचनेत फेरबदल करावे लागणार आहेत. सदर प्रक्रिया सुरू असल्याने त्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेसंदर्भात आक्षेप दाखल झाल्याने या चार ग्राम पंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. तसेच मंगरूळपीर तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरुवात होणार आहे. एससी, एसटी, इतर मागासवर्गीय आदी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या उमेदवाराला अर्जासोबत जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जात पड ताळणी प्रमाणपत्र नसेल तर या प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पोहोच पावती जोडणी बंधनकारक आहे. ऐनवेळी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांची जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्यासाठी एकच धावपळ होत असल्याचे दिसून येते. गत आठ दिवसांत जिल्हय़ातील सहा तहसील कार्यालयांत जातीच्या दाखल्यासाठी जवळपास ४५0 अर्ज आल्याची माहि ती आहे तर जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कक्षाकडे ६00 पेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती आहे.वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालु क्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ अशा एकूण २७३ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावर्षी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जातीच्या दाखल्याबाबत संभ्रम१९९५ पूर्वी जातीचा दाखला देण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. त्यानंतर सदर अधिकार उ पविभागीय अधिकार्यांना देण्यात आले. उपविभागीय अधिकार्यांनी दिलेला जातीचा दाखला हा जात पड ताळणीसाठी ग्राहय़ धरला जाणार आहे. अनेक इच्छुकांकडे तहसीलदारांचा जातीचा दाखला असल्याने आणि जात पडताळणीसाठी तहसीलदारांचा दाखला अंतिमरित्या ग्राह्य धरला जाणार नसल्याने इच्छुकांची चांगलीच धावपळ होत आहे. उमेदवारांची जास्तच धावपळ होऊ नये म्हणून सध्या जातपडताळणी प्रस्तावासोबत तहसीलदारांनी दिलेला जातीचा दाखला स्विकारला जात आहे; मात्र प्रस्तावांची छाननी सुरू झाल्यानंतर सदर अर्ज त्रुटीत येतील, तेव्हा संबंधित उमेदवाराला उपविभागीय अधिकार्यांनी दिलेला जातीचा दाखला सादर करावा लागेल, असे समाजकल्याण विभागाच्या एका अधिकार्याने स्पष्ट केले.
मंगरुळपीर तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकल्यात!तांत्रिक अडचणीमुळे मंगरुळपीर तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणूक २0१७ कार्यक्रम जाहीर केला होता. मंगरुळपीर तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या; परंतु तांत्रिक अडचणीमुळे माळशेलू, जनुना, कोळंबी, पोटी, अरक, गोलवाडी, कळंबा, सावरगाव, नांदगाव, पिंपळगाव या दहा ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंगरुळ पीरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी वाहुरवाघ यांनी दिली.