लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी मात्र, १६ सप्टेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७0 टक्केच पर्जन्यमान झाले असून, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघू अशा एकंदरित १२५ प्रकल्पांपैकी निम्म्यांपेक्षा अधिक प्रकल्पांची पाणीपातळी आजही २५ टक्क्यांपेक्षा खालीच आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विहिरी, हातपंप, कूपनलिकांच्या पाणीपातळीतही यंदा विशेष वाढ झालेली नाही. वाशिम शहराची वार्षिक गरज सहा दशलक्ष घनमीटरची असताना शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पात, तर दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, जिल्ह्यातील इतर तालुके आणि ग्रामीण भागातही पाण्यासंदर्भातील चित्र अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचे चटके बसणे सुरू होतील, असा अंदाज वर्तविला जात असून, त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. यावर्षी नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उपाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जाणार असून, त्यास यंदा साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
जुमडा, कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमानवाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, तो साधारणत: डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी २0१८ ते जून २0१८ या सहा महिन्यांत शहरवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून नजिकच्या जुमडा आणि कोकलगाव बॅरेजमधील पाणी ‘ग्रॅव्हिटी पॉवर’ अथवा ‘पम्पिंग’द्वारे सोडण्याच्या हालचाली सध्या सुरू असून, शासनाकडून आवश्यक निधी मंजूर होताच, या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.
वाशिममध्ये जोरदार पावसाची हजेरीजिल्ह्यात यंदा ७0 टक्के पर्जन्यमान झाले असले, तरी वाशिम तालुक्यात मात्र तो ५५ टक्केच असून, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट यामुळे गडद होत असतानाच रविवारी शहर तथा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे एकबुर्जीमधील जलसाठा विशेष वाढणार नसला, तरी खरिपातील तूर आणि कपाशी या पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे मानले जात आहे.