लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, ग्रामीण भागातील सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या. नजीकच्या हिंगोली, परभणी, बुलडाणा जिल्ह्यांतून येणारे रस्ते स्थानिक पोलीसपाटील, तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीने सीमेवरील रस्त्यावर दगड, मुरूम, झाडाच्या फांद्या टाकून बंद केल्या होत्या. यादरम्यान या सीमेजवळील भागातील गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. साखरा, केलसुला, ब्राह्मणी, कापडसिंगी, रायगाव सावरगाव, गांधारी, शिवणी जाट, देऊळगाव, सोनुना, वढव, हिरडव, आरडव, पहुर, दाभा अशा विविध गावांतील नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यापेक्षा रिसोड, वाशिम बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त तसेच साहित्य, माल खरेदीसाठी या गावातील नागरिक हे रिसोड, वाशिमला जातात. जिल्हा सीमावर्ती भागामध्ये काही गावांनी थेट जिल्हा सीमाच बंद केल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. दरम्यान, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्याने जिल्हा सीमावर्ती भागातील रस्तेही मोकळे होणे अपेक्षित आहे. मात्र, मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावर अजूनही मुरूम, झाडाच्या फांद्या जैसे थे असल्याने हा मार्ग बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते ‘लॉक’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 12:00 PM