वाशिम : ‘माझे कुटुंब, माझी पेन्शन’ या शिर्षाखाली जूनी पेन्शन योजना यांसह १८ मागण्यांच्या पुर्ततेसाठी ८ नोव्हेंबर रोजी वाशिम येथे सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचारी समन्वय समितीने सहकुटुंब महामोर्चा आंदोलन केले.
नवीन पेन्शन योजनेमुळे मागील १७ वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत, असा आरोप करीत जूनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जून्या पेन्शनच्या मागणीसाठी यापूर्वी विविध टप्प्यात आंदोलने करण्यात आली. परंतू, अद्यापही त्याची ठोस दखल शासनस्तरावर घेण्यात आली नाही. मार्च २०२३ मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत पुन्हा आंदोलनाची हाक कर्मचारी संघटनेने दिली. १४ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला.
तत्पूर्वी ८ नोव्हेंबर रोजी ‘माझे कुटुंब, माझी पेन्शन’ या शिर्षाखाली जूनी पेन्शन योजना यांसह १८ मागण्यांच्या पुर्ततेसाठी वाशिम येथे कर्मचारी समन्वय समितीने सहकुटुंब महामोर्चा आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तात्या नवघरे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव रवींद्र सोनोने, उपाध्यक्ष स्वाती वानखडे, जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर तुर्के, सचिव अमोल कापसे, विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गजानन उगले, मोहनराव शिंदे, शाहू भगत, अतुल देशमुख, दीपक भोळसे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या माध्यमातून कर्मचारी संघटनेने राज्य शासनाकडे निवेदन सादर केले.