लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा महाली (वाशिम) : वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेने दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रत्येकी दोन वृक्षरोपांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाला उदंड प्रतिसादही लाभला आहे.राज्य शासन राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमात सर्व प्रशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालयांना स्वतंत्र उद्दिष्ट देण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनात आपला वाटा असावा म्हणून खासगी, स्वयंसेवी संस्थांनीही या वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला आहे. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील सैनिक शाळेने मात्र पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रत्येकी दोन वृक्षरोपे लावण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाला शिक्षकांपासून सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला पालकवर्गाचाही उदंड प्रतिसाद लाभत असल्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे. यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत ८८१ विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १०० जण कार्यरत असून, हा उपक्रम तडीस नेण्यास सर्वच परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी कर्नल पी. पी. ठाकरे, प्राचार्य एम. एस. भोयर, शाळेतील हरीतसेनेच एम. एन. वानखडे, पी. व्ही. गाडेकर, एन. के. भेडे, पी. एस. पाचकोर, शिक्षिका डी. पी. पाटील, तसेच प्रसिद्धी प्रमुख आर. आर. पडवाल सहकार्य करीत आहेत.
सैनिक शाळेचा दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 3:22 PM