वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियोजित वेळेत होण्यासाठी यापुढे ‘सीएमपी’ प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.
जिल्हा परिषद व खासगी अनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमार्फत करण्यात येते. तथापि वेतन खात्यावर जमा होण्यासाठी वेगवेगळया प्रक्रियेमधून कार्यवाही करावी लागत असल्यामुळे वेतन जमा होण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे ‘सीएमपी’ प्रणालीव्दारे वेतन थेट खात्यात जमा झाल्यास श्रम व वेळेची बचत होऊन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, या उद्देशातून शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांनी जिल्हास्तरीय समितीचे गठन केले. या समितीची बैठक २८ जुलै रोजी शिक्षणाधिकारी तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, यावेळी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश अहाळे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) गजानन डाबेराव, वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक) बाबाराव काळपांडे, वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) बाळकृष्ण इंगोले, कक्ष अधिकारी गजानन खुळे, वरिष्ठ लिपिक प्रमोद मराठे आदींची उपस्थिती होती. यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘सीएमपी’व्दारे करण्यासाठी उ्दभवणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे, ‘सीएमपी’व्दारे वेतन होण्यासाठी वरिष्ठांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करून कार्यवाही करणे व पाठपुरावा करणे, सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक अद्ययावत करून घेणे आदी विषयांवर चर्चा झाली. यापुढे शिक्षकांच्या वेतनास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी तांगडे यांनी दिल्या.
०००
वेतनासाठी निश्चित कार्यक्रम !
‘सीएमपी’ प्रणालीव्दारे वेतन होण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम तयार करून त्यानुसार कामकाज करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी तांगडे यांनी दिल्या. तांगडे यांच्या कार्यतत्परतेमुळे ‘सीएमपी’ प्रणालीव्दारे वेतन होण्याबाबत रखडलेल्या विषयास गती मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.