वाशिम : राज्यात नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला असला तरी जिल्ह्यात चोरीछुपे नव्हे तर खुलेआम नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमत चमूने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आले. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवित विक्रेते संबंधित शासन यंत्रणेला हाताशी धरुन आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. जिल्हय़ात विक्री होत असलेल्या नायलॉन मांजापासून काय परिणाम होतात, याची एकाही विक्रेत्यास कल्पना नाही. ग्राहक परत जाऊ नये म्हणून नायलॉन मांजा दुकानात ठेवावा लागतो. जिल्हय़ात जवळपास ८७ पतंग विक्रेते आहेत. या सर्वांजवळ शरीरासाठी घातक असलेला नायलॉन मांजा विकल्या जात आहे. नॉयलॉन मांजाची खरेदी जिल्हय़ातील व्यापारी सुरत, अकोला व अमरावती येथून करतात. अकोला व अमरावती येथून येणारा माल हा स्वत: व्यापारी घेऊन येतात, तर सुरतहून येणारा माल हा कुरिअर सर्व्हिसने मागविला जात असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. नायलॉन मांजाचे ५ प्रकार असून, ६0 रुपयांपासून तर २५0 रुपये रीळप्रमाणो विकल्या जात आहे. यामधील खुला मांजा २५ ते ३0 रुपयामध्ये कागदामध्ये बांधून दिला जातो. नायलॉन मांजा मकरसंक्रांतीनिमित्त लागलेल्या पतंगांच्या दुकानावर मोठय़ा प्रमाणात, तर शहरातील काही मोजक्याच जनरल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. मांजाचे ठोक विक्रेते किरकोळ दुकानदारांना उधारीवर माल देत असून उर्वरित माल परत घेण्याची हमी देत असल्याने प्रत्येक दुकानात याची विक्री बिनधास्तपणे चालू आहे. नायलॉन मांजा वजनाने हलका असल्याने पतंग उडविणार्यांना तो हाताळण्यास सोपा जातो म्हणून याचा वापर मोठय़ा प्रमाणात केल्या जातो. किरकोळ विक्रेत्यांना यावर जवळपास ४0 टक्के नफा असल्याने व कोणतीही झंझट नाही.
*मांजा घातकच: त्वचारोग तज्ज्ञांचे मत
पतंग उडविण्यासाठी वापरल्या जात असलेल्या नॉयलॉन मांजाकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. याबाबत एका ग्राहकाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नायलॉन मांजा हलका असल्याने पतंग हवेत लवकर उडते. साधा मांजा वजनाने जास्त असल्याने पतंग वर गेल्यानंतर ह्यझोलह्ण राहत असल्याने पतंग उडविण्यात मजा येत नाही. तसेच विक्रेत्यांचाही कल नायलॉन मांजाकडेच दिसून आला. रेडिमेड पेटी पॅक येत असलेल्या मांजाला काहीही न करता सरळ विकता येतो. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जात असलेला विशेष दोरा (मांजा) आरोग्यासाठी घातक असून, यामुळे अनेक त्वचारोग निर्माण होऊ शकतात, असे त्वचारोग तज्ज्ञ व डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर पुढे आले. यामध्ये वापरण्यात येत असलेल्या बायडिंग केमिकलमुळे काही जणांना ताबडतोब अँलर्जी होते, तर काहींना काही अवधीनंतर याचा प्रभाव जाणवतो.