बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना बेभाव बियाणे विक्री चालू असल्याने तालुका कृषी अधिकारी सोनटक्के व कृषी अधिकारी मकासरे पंचायत समिती यांना निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नसल्याची खंत परिवर्तन शेतकरी सघंटनेचे मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत मनोहर राठोड यांनी म्हटले की, दिवसेंदिवस शेती करणे मोठ्या जिकिरीचे झाले असून आधुनिक शेतीची जागा यांत्रिक तंत्राने घेतल्याने शेती व्यावसायिक धंदा झाला आहे. त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी ओरबाडला जात असून पेरणीपासून माल विक्री करेपर्यंत शेतकऱ्यांची लक्तरे तोडली जातात. आज हंगामीची तयारी करीत असताना बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीत शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार चालू असताना प्रशासनाचा कृषी विभाग गाढ झोपेत आहे. बाजारात बी-बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी कृषी केंद्रात जाऊन स्टाॅकबुक, आवक-जावक, बिल बुक व गोडाऊनची तपासणी करून शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे देणे बंधनकार असताना येथे मोठ्या प्रमाणात बियाणे विक्रीत अनियमितता करण्यात येत असल्याचे आरोप शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केले.
हा कारभार दोन दिवसांत बंद न झाल्यास कृषी अधिकाऱ्याच्या दालनात बसून आंदोलन करणार असल्याचे मत मनोहर राठोड यांनी व्यक्त केले असून, या प्रकरणी निवेदन देऊनही अधिकारी दखल तर घेतच नाही; पण त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केल्यास फोन उचलत नाहीत, असेही राठोड यांनी म्हटले.