- अरूण बळी मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावात गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई असून, ग्रामस्थांना पाणासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली. त्यानंतर ६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. मालेगाव तालुक्यात ११४ गावे आहेत. त्यापैकी २८ गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून ३० ग्रामपंचायतीनी विहिरी कूपनलिका अधिग्रहणाचे तर ८ ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी विहिरी कूपनलिकाचे २६ तर ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाले पाठविण्यात आले होते. त्यापैकी विहिरी, कूपननलिकेचे ११ प्रस्ताव चर ६ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि पिंपळवाडीसह इतर गावांत टँकर मंजूर झाले होते. त्यामुळे टँकर गावात पोहचून ग्रामस्थाना पाणी मिळेल अशी आशा वाटू लागली होती; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळ मंजूर झालेल्या ६ टँकर पैैकी खैरखेडा वगळता अद्याप एकाही गावात टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. घडाभर पाण्यासाठी मैलभर भटकणाºया ग्रामस्थांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असून, मंजूर झालेले टँकर पावसाळ्यात गावात पोहोचणार काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात तीन महिन्यांपासून पाण्यासाठी भटकत असणाºया ग्रामस्थांसाठी सुविधा म्हणून २० दिवसांपूर्वी टँकर मंजूर करण्यात आले खरे; परंतु अद्यापही ६ पैकी पाच गावांत टँकरच पोहोचले नाही. त्यामुळे कागदोपत्री उपाय योजना दाखवून ग्रामस्थांची हेटाळणी करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या या कृतीबाबत पाणीटंचाईचा सामना करणाºया गावांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आता गावात टँकरची प्रतिक्षा करणारे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
टँकर मंजूर झालेल्या गावांत येत्या दोन दिवसात टँकर पोहचले नाही, तर मालेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला सुरुवात करू.-अन्नपूर्णा दिलीप भुरकांडे -पं. स. सदस्या