ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 23 - जिल्हा प्रशासनाच्यावतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमास्थळी सुमारे ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन स्वच्छ भारत अभियानच्या लोगोची निर्मिती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छ भारत अभियान चा लोगो मानवी साखळीद्वारे तयार केला जाणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही मानवी साखळी यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालीम सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या संख्येने विद्यार्थी मानवी साखळीमध्ये सहभागी होत आहेत. हा उपक्रम नवा विक्रम स्थापित करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. २४ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २४ जानेवारी रोजी बालिका महोत्सव, २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड उपस्थित होते. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय बालिका महोत्सवात सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे सुमारे पाचशे विद्यार्थिनी एकत्र येऊन बेटी बचाओ, बेटी पढाओचा लोगो तयार करणार आहेत. तसेच २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने वाशिम मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवी साखळीव्दारे ' स्वच्छता अभियान ' चा लोगो !
By admin | Published: January 23, 2017 10:24 PM