- संतोष वानखडे
वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना प्रत्येकी एका, एका गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ४ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना एका पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुकास्तरीय विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून द्यावे लागणार आहे. तेथे स्वच्छतेविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे. अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी ही संपर्क कर्मचारी, अधिकाºयांवर राहणार आहे.अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग घेणे, गृहभेटी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालयाच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना भेटी देणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेचा जागर करणे, आठवडी बाजाराच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, शाळा तसेच महाविद्यालयांत स्वच्छताविषयक कार्यक्रम घेणे, गणेशोत्सव कालावधीत गाव स्तरावर श्रमदानातून ग्रामस्वच्छता व शाश्वत स्वच्छतेच्या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे, असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार आहेत.-- ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासंदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे पत्र मिळाले असून, त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात नियोजन केले जात आहे.- दीपककुमार मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम