लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकही निश्चिंतच होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यापासून सॅनिटायझरच्या विक्रीत जवळपास ७० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरोघरी सॅनिटायझरने बाटल्या भरलेल्या असायच्या. सावधगिरीचा प्रयत्न म्हणून घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात होता. असे. मात्र, अनलॉक सुरू झाले, लसीकरणामुळे शहरवासीयांमध्ये बिनधास्तपणा आला आणि सॅनिटायझरचा हळूहळू विसर पडत चालला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. प्रत्येकाने मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जात आहे. मात्र, शहरात अजूनही २० ते २५ टक्के नागरिक विनामास्क फिरताना दिसतात. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून सॅनिटायझरची विक्री तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यामुळे लोकांनी सॅनिटायझर खरेदी करणे कमी केले होते. मात्र, पुन्हा फेब्रुवारी-२०२१ मध्ये दुसऱ्या लाटेमुळे सॅनिटायझरची विक्री वाढली. जून महिन्यापासून दुसरी लाट ओसरत आहे तसेच लसीकरणालादेखील गती मिळत आहे. त्यामुळे निर्बंध असतानाही लोक निर्बंधमुक्त झाल्यासारखे वावरत असल्याचे दिसून येते.
सॅनिटायझरच्या विक्रीत ७० टक्के घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:16 PM