लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाºया वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने वाशिम येथे या वस्तूंचा मॉल उभारण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ३० मार्चला येथे केले. जुनी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती पानुताई जाधव, अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनीत उभारण्यात आलेल्या स्टॉलला भेट दिली. पालकमंत्री ाठोड म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला बचत गट, शेतकरी गटांची उत्पादने, वस्तूंना जिल्हास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या उत्पादने, वस्तूंच्या विक्रीसाठी वाशिम येथे मॉलची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने इतर आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी होणाºया या मॉलमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकरी गटांची उत्पादने एकाच छताखाली खरेदीची संधी ग्राहकांना मिळेल. या माध्यमातून बचत गट, शेतकरी गटाच्या अर्थकारणाला गती मिळेल व महिला बचत गटांच्या गटांच्या चळवळीला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. महिला बचत गटांना अधिकाधिक मदत करून त्यांच्या उद्योग, व्यवसायात सहाय्य करण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. बचत गटांनी पारंपारिक वस्तू, उत्पादनांसोबत नवीन क्षेत्रातील संधींचा सुध्दा शोध घेऊन त्यानुसार व्यवसाय सुरु केला पाहिजे. या व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य मिळविण्यासाठी त्यांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेता येईल. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयोजित केलेली तीन दिवशीय प्रदर्शनी महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.