वाशिम - आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शुक्रवार १४ जून रोजी जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यानंतर शनिवार १५ जून रोजी ही पालखी शिरपूर जैन येथे दाखल होणार असून, पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी शिरपूरवासियांकडून करण्यात येत आहे. मागील ५२ वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी उत्सवासाठी पंढरपूर येथे जात असते. यावर्षीही श्रींची पालखी ६ जून रोजी शेगाव येथून मार्गस्थ झालेली आहे. श्रींची पालखी अकोला मार्गे वाडेगाव पातूर येथून १४ जून रोजी वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत गजानन भक्त श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत. ही पालखी १४ जून रोजी मेडशी येथील भोजन व विश्रांती आटोपून श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्कामी राहील. १५ जून रोजी पालखी डव्हा येथून मालेगावकडे रवाना होईल. मार्गात नागरतास येथे भाविकांच्यावतीने पालखीचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पालखी मालेगाव शहरात दाखल होईल. शहरातील भाविकांनी भक्ती व उत्साहपूर्ण वातावरणात श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी चालविली आहे. दरवर्षी प्रमाणे मालेगाव येथे श्रींच्या पालखी सोहळ्यात सहभागी ७०० वारकºयांसह भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विश्रांतीनंतर श्रींची पालखी शिरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करेल. या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी भाविकांनी केली आहे.
Ashadhi Ekadashi Special: संत गजानन महाराज यांची पालखी शनिवारी शिरपुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 4:56 PM