संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहुली येथे ९ ते १४ फेब्रुवारीपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे पारायण झाले. भागवत वाचक देवानंद महाराज यांच्या वाणीतून भागवत कथावाचन पार पडले. दररोज भाविकांनी भागवत कथा ऐकण्यासाठी सहभाग घेतला. जयंती सोहळा सप्ताहभरात दररोज ग्रामस्वच्छता करण्यात आली. मुलींनी डोक्यावर कलश घेऊन प्रभातफेरी काढली. संत सेवालाल महाराज यांच्या पालखीची गावात प्रदक्षिणा काढण्यात आली. रस्त्यात भाविकांनी नैवेद्य दाखवून पूजन केले. यावेळी भजने म्हणत डफलीच्या तालावर नाचत जयंती सोहळा उत्साहात पार पडला. गावात पालखीसोबत असणाऱ्या भाविकांना नागरिकांना नाश्ता, चहापाणी, प्रसाद वाटप करण्यात आले. १५ फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन शिवपुरी महाराज यांनी केली. यावेळी भाविक व पुजारी अमोल राठोड यांनी बापूंना भोग लावला व अरदास व आरतीनंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आला. जयंती शांततेत पार पडावी म्हणून संत सेवालाल महाराज संस्थानचे सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
माहुली येथे संत सेवालाल महाराज जयंती सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:18 AM