कारंजा लाड (जि. वाशिम): प्रशासनाचा वचक नसल्यामुळे कारंजा शहरातील जलव्यवस्थापनाचा आदर्श नमुना असलेला सारंग तलाव निर्ढावलेल्या अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केला आहे. ऐतिहासिक उपलब्धी असलेला हा तलाव आता नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोमवारी लोकशाही दिनाच्या औचित्यावर जिल्हाधिकार्यांनी हे प्रकरण हाती घ्यावे, अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहे. प्राचीन काळात इतर नगरांप्रमाणे कारंजा शहराचे जलव्यवस्थापन सुनियोजित होते. ऋषी तलाव, चंद्र तलाव, सारंग तलाव, बाराव, विहिरी, आड याद्वारे जलसाठवण करण्यात येत होती; परंतु कालांतराने पाणी पुरवठा करणार्या शासकीय सुविधा उपलब्ध झाल्याने परंपरागत जलव्यवस्थापनाचे महत्त्व कमी झाले. कारंजा शहराच्या पश्चिमेस असणारा तलाव म्हणजे सारंग तलाव. तो पूर्वी जलतरण तलाव व पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून उपयुक्त होता. हा तलाव प्राचीन मानला जातो. हा तलाव ह्यवाइड सर्व्हे अँड सेटलमेंट डिपार्टमेंटह्ण यांच्या पत्र क्रमांक ५२२/१६ दिनांक २२ जुन १९३१ या हुकुमान्वये कोणताही मोबदला न घेता किंवा भाडे न आकारता कारंजा नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आला. या हस्तांतरणाची नोंद नगरपरिषदेच्या दप्तरी आहे. तलावाचे क्षेत्रफळ १,१४, ६६३ चौरस मीटर म्हणजे १,२३, ४२२ चौरस फुट एवढे आहे. याची शिट क्रमांक १२.९ असा असून प्लॉट क्रमांक २२ आहे. कारंजा शहराच्या पश्चिमेस असलेल्या या तलावात बाहेरून येणारे पाणी साठवले जाते. पावसाळ्यात साठवलेल्या या पाण्यामुळे कारंजा शहरातील विहिरीची पातळी स्थीर ठेवण्यास मदत होते. जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व लोकांना कपडे धुण्याची सोय हा या तलाव उभारणीचा उद्देश असावा; परंतु सद्यस्थितीत या तलावाला अतिक्रमणाचा घट्ट विळखा बसला आहे.
सारंग तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
By admin | Published: July 06, 2015 2:10 AM