लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : १ जुलैला कारंजा शहरात धो-धो पाऊस बरसला. या पावसाचे पाणी सारंग तलावात जाम व्हायला हवे होते; पण नियोजनाच्या अभावाने लाखो लिटर पाणी मुख्य रस्त्यावरून वाहून गेले. महाराष्ट्र शासन जलसंवर्धनास विशेष महत्त्व देत आहे. पाणी फाउंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहणारे पाणी अडवा, अडवलेले जिरवा व जलसमृद्ध व्हा, असा संदेश दिला जातो; पण याची जाणीव कारंजा शहराच्या प्रशासन यंत्रणेला नाही, असेच म्हणावे लागेल. बायपास ते शिवाजी नगर हा सिमेंट रस्ता बांधण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दोन महिने या रस्त्याने वाहतूक झाली नाही. याच रस्त्याच्या कडेला सारंग तलाव आहे. या रस्त्यावरून पावसाचे पाणी पुरासारखे वाहते. हे सर्व पाणी सारंग तलावात अडविण्याची योजना होती; पण नियोजित वेळी काम न झाल्याने या रस्त्यावरील पाणी साठविण्याची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे हे पाणी सर्व रस्त्यावरून वाहते होते. १ जुलैला पुन्हा याची प्रचिती आली. योजना अशी होती की, या रस्त्यावरून येणारे पाणी सारंग तलावात जमा होईल. त्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या नाल्या तयार करण्यात आल्या; परंतु त्यांचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे या रस्त्यावरून वाहणारे पाणी या पूर्वीच राधाकृष्ण हॉटेलसमोर जमा झाले होते. आता हे सर्व पाणी कारंजा शहराच्या मुख्य रस्त्यावरून वाहिले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी जमा व्हावे म्हणून पूल व नाली करण्यात आली; पण पावसाळा होईपर्यंत काम पूर्ण न झाल्याने अर्धवट व सदोष कामामुळे लाखो लिटर पाणी कारंजा शहराच्या मुख्य रस्त्यावरून पुरासारखे वाहत गेले. संबंधित यंत्रणेने व प्रशासकीय विभागाने लक्ष दिले नाहीत तर असे लाखो लिटर पाणी वाहून जाईल. त्यासाठी संबंधितांनी त्वरित काम पूर्ण करणे आवश्यक आहे. शिवाजी नगर ते झाशी राणी चौकपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे नालीचे काम करणे बाकी आहे. सारंग तलावापर्यंत नालीचे पक्के बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल. -आर.डी.नवलकर,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
सारंग तलावाचे ‘पाणी’ रस्त्यावर!
By admin | Published: July 04, 2017 2:22 AM