कोरोनाच्या संकटामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. ही गरज भागविण्यासाठी लोकमत समूहाने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. याकरिता उपविभागीय महसूल अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार धीरज मांजरे यांनी पुढाकार घेऊन गावातील कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी रक्तदान करणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या मार्गदर्शनात ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई व इतर कर्मचारी सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
......................
प्रतिक्रिया -
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. ही गरज भागविण्यासाठी लोकमत समूहाने रक्तदानास प्रोत्साहन मिळावे, याकरिता रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले. या कार्यात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सक्रिय सहभाग नोंदवतील. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
- राहुल जाधव, उपविभागीय अधिकारी, कारंजा
................
कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी रक्तदानाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवतील. ज्या नागरिकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांनी ती घेण्यापूर्वी रक्तदान करावे, याबाबत जनजागृती केली जात आहे.
- धीरज मांजरे, तहसीलदार, कारंजा
.................
रक्ताचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी वेळप्रसंगी गरजू रुग्णांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचविणे शक्य होते, अन्यथा संबंधितांना प्राणास मुकावे लागते. त्यामुळे रक्तदानाच्या कार्यास आता गती मिळायला हवी. लोकमतने हाती घेतलेल्या रक्तदानाच्या उपक्रमात पंचायत समितीचा सहभाग असणार आहे.
- कालिदास तापी, गटविकास अधिकारी, कारंजा