वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर आता सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी ७५ सरपंचपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी प्रबळ दावेदारांची यादी मोठी असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून पॅनलप्रमुख विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसून येते. सरपंचपद मिळाले नाही, तर काही इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ऐनवेळी धक्कादायक निकालही लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ फेब्रुवारी रोजी तर १२ सरपंचपदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. वाशिम तालुक्यात १५ व १६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १२ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे. मानोरा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ फेब्रुवारी रोजी तर १६ फेब्रुवारी रोजी ९ आणि १७ फेब्रुवारी रोजी चार ग्रा.पं. सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे. मालेगाव तालुक्यात १५, १६ व १७ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १० ग्रामपंचायत सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात येणार आहे.- सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम