वाशिम : सरपंच, उपसरपंचांचे थकीत मानधन द्यावे, वाढीव अनुदानासह थकीत बैठक भत्ता द्यावा यांसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंचांनी १८ डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीदेखील उडी घेतल्याने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींचे कार्यालय कुलूपबंद असल्याचे सोमवारी (दि.१८) पाहावयास मिळाले.
ग्रामपंचायतींसंदर्भातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर असे तीन दिवस ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. पहिल्याच दिवशी या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सरपंच सेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुनिता बबनराव मिटकरी यांनी दिली. ग्रामपंचायती कुलूपबंद असल्याने विविध प्रकारचे दाखले मिळणार नसल्याने गावकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
या आंदोलनामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरपंच किंवा ग्रामसेवकांकडून कोणताही दाखला मिळाला नसल्याने लाभार्थींच्या पदरी निराशा पडली.