जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामपातळीवर राबविण्यासाठी आणि लोकनियुक्त सरपंच, सदस्यांनी नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुचविलेले कामे करून घेण्यासाठी ग्रामसचिव (ग्रामसेवक) दर दिवशी नियुक्तीला असलेल्या गावाला हजर असणे आवश्यक असल्याचा विसर सोमठाणा येथे नियुक्तीला असलेल्या ग्रामसेवकांना पडल्याचा लेखी आरोप सरपंच सोनोणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केला आहे.
ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने ग्रामवासीयांना पेयजल उपलब्ध होत नाही, रस्ते विकासाची कामे अडलेली आहेत. नाल्या तुंबून ग्रामवासीयांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामसचिव नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याने असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा सरपंच यांचा आरोप आहे. सरपंच सोनोने यांनी यापूर्वीसुद्धा नियुक्तीला कायम असणारा ग्रामसेवक देण्याची मागणी वरिष्ठांकडे केलेली असूनही कामचुकार ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे.
सोमठाणा येथे नियमित येणारा व जनतेचे प्रश्न, विकासकामे मार्गी लावणारा ग्रामसचिव तातडीने देण्याचा व विद्यमान न येणाऱ्या ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणीही सरपंचांनी केली आहे.