००
केनवड येथे पाणंद रस्त्याचे काम रखडले
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पाणंद रस्त्यांचे किमान खडीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी केली.
००००
मालेगाव येथे आणखी चार बाधित
वाशिम : मालेगाव शहरात आणखी चारजणांचा कोरोना चाचणी अहवाल १ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००
प्रकल्प दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : वाशिम तालुक्यातील जवळपास दहा लघु प्रकल्पाच्या गेटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाणी गळती होते. या प्रकल्प दुरुस्तीसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळाला नसल्याने दुरुस्ती रखडत आहे.
००
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : निर्बंध शिथिल झाल्यानंतर मालेगाव, रिसोड येथील बाजारपेठ मंगळवारी पूर्वपदावर येताच दुकानांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे दिसून आले.
००००
पोहरादेवी येथे आरोग्य तपासणी मोहीम
वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आणखी तीनजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १ जून रोजी निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षण केले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली.