वाशिम : राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १०७६ अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा गजर करण्यात आला.
स्त्री भ्रूण हत्या रोखणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तरातील दरी कमी करणे, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी उद्देशातून राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून यंदा २१ ते २६ जानेवारी या दरम्यान अंगणवाडी स्तरावर ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाची जनजागृती केली जात आहे. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र स्तरावर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, आकर्षक रांगोळीतून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यात आला. वाशिम बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही अंगणवाडी केंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेतूनही बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानावर प्रकाश टाकण्यात आला. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले तसेच पालकांचे प्रबोधन करण्यात आले. वाशिम तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली, असे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्र स्तर, गावस्तरावर २६ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम, उपक्रमातून बेटी बचाओ, बेटी पढाओची जनजागृती केली जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोल्हे यांनी स्पष्ट केले.