ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता ७ डिसेंबर रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी शिरपूर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले होते. तथापि, निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने सरपंच पदाचे राज्यभरात काढलेले आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या १७ सदस्यीय शिरपूर ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा अनुसूचित जातीसाठी निघाले. त्यामुळे शिरपूर ग्रामपंचायतीची सरपंच अनुसूचित जातीतील महिला होणार असल्याचे दिसत आहे. गत १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक अंभोरे यांचे क्रांती पॅनेल, अशोकराव देशमुख, इमदाद बागवान यांची तिसरी आघाडी व सलीम गवळी यांच्या जय हो या गटाचे १७ पैकी १२ सदस्य निवडून आले. या गटाकडून अनुसूचित जातीच्या राजकन्या आढागळे सदस्य निवडून आल्या आहेत. त्याच शिरपूर येथील सरपंच होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. दुसरीकड गाभणे-शर्मा गटाच्या एकता पॅनेलचे केवळ पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यामध्ये सिंधू कांबळे या अनुसूचित जातीच्या सदस्य आहे.
-----------
सरपंच पदासाठी दोन दावेदार
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव अंभोरे, तिसऱ्या आघाडीचे अशोकराव देशमुख, माजी जिल्हा परिषद इमदाद बागवान व जय हो पॅनलचे सलीम गवळी यांच्या गटाने एकत्रितरीत्या ग्रामपंचायत निवडणूक लढविली. त्यामध्ये त्यांच्या गटाचे १७ पैकी १२ सदस्य निवडून आले. यामध्ये सरपंच पदासाठी एकमेव सदस्य राजकन्या संतोष आढागळे या निवडून आल्या आहेत, तर गाभणे शर्मा यांच्या एकता गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. या गटामध्ये सिंधू कांबळे या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामुळे या ठिकाणी सरपंच पदासाठी दोन दावेदार आहेत. तथापि, गाभणे गटाकडे अपेक्षित सदस्य संख्या नसल्याने सिंधुबाई कांबळे यांना सरपंच पद मिळण्याची शक्यता नाही.