लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ एप्रिलऐवजी २३ मे रोजी होणार असून विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविल्यानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २५ एप्रिल रोजी होणार होती; मात्र शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २५ एप्रिलदरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अभ्यासाकरिता आता आणखी काही दिवस मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. ती आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 10:44 AM