वाशिम : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला असून, आता दहावी, बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत; पण तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे.
दहावी- बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे, जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही; परंतु आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही जिल्ह्यातील शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रांपर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे.
या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका, आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनाच स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे लागणार आहे.
०००००
परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागून
जिल्ह्यात बारावीचे १८ हजार १७५ आणि दहावीचे १९ हजार ७१५ विद्यार्थी आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्याच नाहीत. दोन महिन्यांचा अपवाद वगळता विद्यार्थ्यांना घरी राहूनच अभ्यास करावा लागला. ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने परीक्षेची तयारी केली. आता परीक्षेची तारीख लांबली असून, परीक्षा केव्हा होणार याबाबत स्पष्टता नाही. परीक्षेची तारीख जाहीर केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
०००
दहावीतील विद्यार्थी- १९,७१५
बारावीतील विद्यार्थी- १८,१७५