विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून समग्र शिक्षा अभियानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश दिले जातात. कोरोनामुळे यंदा राज्यासमोर आर्थिक संकट असल्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे एका महिन्यापूर्वी शासनाकडून जिल्ह्याला एक कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला. जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वितरित करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीने गणवेशाची खरेदी केली असून, बहुतांश पात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पुरविला आहे.
००
दुसऱ्या टप्प्यातील निधीची प्रतीक्षा
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला १.७० कोटींचा निधी मिळाला आहे. दुसरा गणवेश घेण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाला नाही. दुसऱ्या टप्प्यातील निधी केव्हा मिळणार? याबाबत तूर्तास तरी काही निश्चितता नाही.
००
समग्र शिक्षा अभियानातून पात्र विद्यार्थ्यांना प्रति दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी शिक्षण विभागाला १.७० कोटींचा निधी प्राप्त झाला. हा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शालेय व्यवस्थापन समितीला दिला आहे. शालेय व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी केली असून, पात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पुरविण्यात आले. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी केली जात आहे.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी