लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून शाळांना पुरविल्या जाणाऱ्या तांदळाचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी भरत आहे. शिक्षकांकडून या तांदळाचे वजन केल्यानंतर क्विंटलमागे १२ किलोची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करताना अडचणी येत आहेत. शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना धान्याचा पुरवठा होतो. हा पुरवळा भारतीय खाद्यान्य महामंडळाकडून शासनाच्या गोदामात साठवणूक करून या योजनेतील धान्य आवश्यकतेनुसार शाळेत पोहोचविले जाते. यामध्ये मोठया लहान शाळांना विद्यार्थी संख्येनुसार धान्याचा पुरवठा होतो. त्यात तांदळाचे प्रमाण साधारण ५ ते ७ क्विंटल, असे राहते. हा तांदूळ ५० किलो वजनाच्या पोत्यात भरलेला असतो. हा तांदूळ पोहोच करताना त्याचे वजन संबंधित वाहनमालक अथवा यंत्रणेकडून करून दिले जात नाही. हा तांदूळ उतरवून घेतल्यानंतर ५० किलोच्या पोत्यात साधारण ६ किलो तांदूळ कमी भरत असल्याने शिक्षकांना वितरण प्रक्रियेदरम्यान आढळून येत आहे. अर्थात दोन पोत्यांतील तांदूळ प्रत्येकी ३ किलो प्रमाणे विद्यार्थ्यांना वितरीत केल्यानंतर शंभर पैकी चार विद्यार्थ्यांना वितरीत करण्यास उरत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण कसे करावे, हा प्रश्न शिक्षकांना पडतो.
आमच्या शाळेत गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहारांतर्गत मिळणाऱ्या तांदळाचे वजन एका कट्टयामागे ६ ते ८ किलो कमी भरते. त्यामुळे शाळेत सव विद्यार्थ्यांना समप्रमाणात तांदूळ वितरीत करण्यात अडचणी येत आहेत.
-राजेश मते, शिक्षक जि.प. शाळा, वाघोळा
पुरवठादारांकडून पोषण आहार योजनेत मिळणाऱ्या तांदळाचे वजन एका कट्टयामागे ४ ते ६ किलो कमी भरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तांदळाचे वितरण करण्यात अडचणी येत असून, काही विद्यार्थ्यांना पदरच्या पैशातून तांदूळ आणून त्याचे वितरण करावे लागते.
-राजेश मोखडकर शिक्षक, जि.प.शाळा, सोहोळ
पोषण आहार योजनेंतर्गत तांदळाचे वजन कमी भरत असेल, तर पुरवठादारांना याबाबत विचारणा करून माहिती घेऊ. तसेच शिक्षकांनाही अडचणी येऊ नये म्हणून तांदूळाचे वजन करून देण्याच्या सुचनाही करू.
-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. वाशिम