संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणार्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेला (एलिमेंटरी व इन्टरमिजिएट) २१ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी वाशिम येथील केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या परीक्षेसाठी उपकेंद्र देण्यास खासगी शाळांनी नकार दिल्याने प्रशासनाचे नियोजन हुकले. स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या एकमेव केंद्रावर विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर सोडविण्याची कसरत करावी लागली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्याच्या कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेला (एलिमेंटरी व इन्टरमिजिएट) दरवर्षी घेतली जाते. चित्रकला परीक्षेतील गुण हे २0१७ पासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत समाविष्ठ केले जात असल्याने यावर्षी चित्रकला परीक्षेतील विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ वाढला आहे. वर्ग सातवीपर्यंच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी परीक्षा तर त्यानंतरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इन्टरमिजिएट परीक्षा घेतली जाते. दोन्ही परीक्षेत प्रत्येकी चार पेपर आहेत. एलिमेंटरी परीक्षेला २१ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून, वाशिम जिल्ह्यात विद्यार्थी संख्येनुसार तालुकानिहाय परीक्षा केंद्र देण्यात आले. वाशिम तालुक्यासाठी अनसिंग व वाशिम शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अशी दोन परीक्षा केंद्र आहेत. वाशिम येथील एकाच परीक्षा केंद्रावर शहर व तालुक्यातील एकूण १७५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. यापैकी ७९0 विद्यार्थी एलिमेंटरी तर ९६६ विद्यार्थी इन्टरमिजिएट परीक्षेला बसले आहेत. २१ व २२ सप्टेंबरला एलिमेंटरी परीक्षेचा पहिला पेपर सकाळी १0.३0 ते १ या वेळेत आणि दुसरा पेपरा दुपारी २ ते ४ या वेळेत राहणार आहे तर २३ व २४ सप्टेंबरला इन्टरमिजिएट परीक्षेचे पेपर याच वेळेत राहणार आहेत. जादा विद्यार्थी संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम या एकमेव परीक्षा केंद्रावर ‘सुविधा’ उपलब्ध नसल्याने शहरातील काही खासगी शाळांनी उपकेंद्र म्हणून वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव परीक्षा केंद्र प्रमुखाने ठेवला होता. मात्र, खासगी शाळांचा प्रतिसाद न मिळाल्याने गुरूवारी जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या एकमेव परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पेपर सोडविण्यासाठी आले. सर्व विद्यार्थ्यांंसाठी वर्गखोली व बसण्याची व्यवस्था नसल्याने पहिल्याच पेपरच्या दिवशी गोंधळ उडाला. पेपरपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शाळेच्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांना जमिनीवर बसविण्यात आले तसेच जूनी जिल्हा परिषद परिसरातील जिजाऊ सभागृहात जमिनीवर बसविण्यात आले. दुपारी ३ वाजतानंतर रिमझिम पाऊस सुरू झाल्याने व्हरांड्यातील विद्यार्थ्यांंना व्यत्यय निर्माण झाला होता.
साहित्यसामग्री ठेवण्यात अडचणी!चित्रकला परीक्षेला जाताना आवश्यक साहित्यसामग्री सोबत असणे आवश्यक आहे. यात ए-४ साइजच्या ड्रॉइंग पेपरपेक्षा किंचित मोठा बोर्ड किंवा कार्डबोर्ड, पेन्सिल एचबी, २बी, ४बी, ६बी, शार्पनर, सर्व साहित्य असलेला कंपास बॉक्स, १२ इंचाची पट्टी, पाण्यासाठी वाटी, रंग बनवण्यासाठी पांढरी प्लेट, गोल व चपटे मोठे ब्रश व लहान रबर, लहान सुती कापड किंवा स्पंज, वॉटर कलर्स, पारदर्शक व अपारदर्शक क्रेयॉन कलर इत्यादी सामग्री सोबत असावी लागते. या परीक्षेत केवळ ड्रॉइंगच नव्हे तर रंगकामही करायचे असते. स्थिरचित्र, संकल्पचित्र, स्मृतिचित्रांसोबत काही प्रमाणात अक्षरलेखन आणि निसर्गचित्र करावे लागते. जमिनीवर बसविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांंना उपरोक्त साहित्यसामग्री ठेवताना तारेवरची कसरत करावी लागली.
चित्रकला परीक्षेसंदर्भात माहिती घेतली जाईल. विद्यार्थ्यांंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या जातील. विद्यार्थ्यांंच्या गैरसोयीस कारणीभूत असलेल्यांची चौकशी केली जाईल.- गणेश पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद वाशिम.
चित्रकला परीक्षेसंदर्भात माहिती घेण्यात आली. उपकेंद्र देण्यास नेमका नकार का देण्यात आला, याची चौकशी केली जाईल. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांंची गैरसोय होऊ नये म्हणून अन्य शाळांच्या वर्गखोल्या घेण्यात येतील. - डॉ. डी.डी. नागरेप्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम.