सर्व खासगी आस्थापनाधारकांनी १५ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आपली, तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बुधवार, १० मार्च रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दूध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल्स, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट लॉज यासह इतर सर्व खासगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना चाचणी १६ मार्च ते २१ मार्च या कालावधीत करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यानुसार, जे आस्थापनाधारक काेराेना चाचणी करणार नाहीत, त्यांची दुकाने सील करण्याचा निर्णय वाशिम नगरपरिषदेतर्फे घेण्यात आला आहे.
...................
वाशिम शहरातील दुकानदारांची अशी हाेणार चाचणी
वाशिम शहरातील दुकानदारांसाठी नगरपरिषदेतर्फे १५ मार्चपासून काेराेना चाचणीचे नियाेजन करण्यात आले आहे. १५ मार्च राेजी वाशिम येथील केमिस्ट भवनात व्यापाऱ्यांची, दुकानातील संबधित कर्मचारी वर्गांची तपासणी केल्या जाईल, तर १६ ते १९ मार्चपासून सरदार वल्लभभाई पटेल या शाळेत चाचणीचे नियाेजन करण्यात आले आहे.
................
काेराेना चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक : दीपक माेरे
व्यापाऱ्यांनी आपली व आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. जे दुकानदार काेराेना चाचणी करून घेणार नाहीत, त्यांची दुकाने सील करण्यात येतील. दिलेल्या कालावधीत व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. २१ मार्चनंतर शहरातील व्यावसायिकांना भेटी देऊन त्यांनी काेराेना चाचणी केली किंवा नाही याची पडताळणी केली जाईल. त्यावेळी काेराेना चाचणी न केल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार आहे.
....................
मंगरुळपीर येथे व्यापाऱ्यांचा अल्प प्रतिसाद
मंगरुळपीर शहरात ११ मार्चपासून व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीला व्यापाऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिकांनी चाचणी केली असली, तरी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अद्याप कारवाई केलेली दिसून येत नाही. २२ मार्चनंतर मंगरुळपीर शहरातीलही दुकानदारांची माहिती घेतली जाणार असून, काेराेना चाचणी न केलेल्यांवर जिल्हाधिकारी यांनी आदेशित केल्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.