संचारबंदी नियमांची प्रभावी अमलबंजावणी व्हावी, या दृष्टीने कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी आपण मुख्याधिकारी नसल्याचे दाखवत छुप्या मार्गाने दुचाकीवर शहरातून फेरफटका मारला. यावेळी काही दुकाने संचारबंदीचे उल्लघंन करून सुरू असल्याचे आढळून आले. त्या दुकानावर दंडात्मक कार्यवाही करून दोन दुकाने सील केली. कोरोना संचारबंदीची प्रभावी अमलबंजावणी होण्याच्या दृष्टीने कारंजा नगर परिषदेकडून कोरोना प्रतिबंधक फिरते पथक तयार करण्यात आले. मात्र हे पथक मेन लाईनमधून जात असताना व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद असल्याचे दाखवत पथक पुन्हा परत गेले की, व्यावसायिक पुन्हा दुकाने उघडून व्यवसाय करतात, हे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व राहुल सांवत यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शहरातील सारथी कलेक्शन हे दुकान सील करून त्यांच्यावर कार्यवाही केली. तसेच काही दुकानदारांना ताकीदसुध्दा देण्यात आली की यापुढे दुकाने सुरू दिसल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल. संचारबंदीचे पालन न केल्यास व्यावसायिकांवरसुध्दा कार्यवाही करण्यात येईल, असे डोल्हारकर यांनी सांगितले. शहरातील व्यापारीवर्गानी आपली काळजी घेण्यासाठी शासनाने लावून दिलेल्या संचारबंदीच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी केले.
संचारबंदीचे उल्लंघन करणारी दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:40 AM