संतोष वानखडे
वाशिम : जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा प्रयत्न म्हणून आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्या आहेत, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने चिंता कायम आहे. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. म्युकरमायकोसिसने ११ मे रोजी जिल्ह्यात पहिला बळी घेतला. त्यानंतरही म्युकरमायकोसिसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. मुख्यत: मधुमेही, ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक संभवतो. या आजाराला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागही अॅक्शन मोडवर असून, मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्या आहेत, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का, यासंदर्भात व्यापक प्रमाणात सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागात लवकरच सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची मदत घेतली जाणार आहे.
०००००
बॉक्स
डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण, आशांना प्रशिक्षण मिळणार!
सर्वेक्षण मोहीम राबविण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
००००
बॉक्स
...अशी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे
- गाल, डोळे व दात दुखणे, असह्य डोकेदुखी
- नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा
- चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना
- डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे
- नाकातून रक्त येणे
००००
बॉक्स
म्युकरमायकोसिसचा धोका कुणाला?
मुख्यत: मधुमेही, ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, कोविडनंतर येणारी अशक्ती, बर्न्स, ल्युकेमिया, दीर्घकालीन स्टेरॉइडचा वापर, अयोग्य पोषण, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असतो.
०००००
एकूण कोरोनाबाधित- ४०,१७३
सक्रिय रुग्ण- १,९९३
००००००
एकूण डॉक्टर- ३२०
आरोग्य कर्मचारी- १,७६०
आशा स्वयंसेविका- ४९०
०००००
कोट बॉक्स
वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोरोनातून बरे झालेल्या मधुमेह असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले असून, आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नंतर आशा या आपापल्या कार्यक्षेत्रात असलेल्या मधुमेह रुग्णांची माहिती संकलित करण्याबरोबरच काही लक्षणे आहेत का, काही त्रास जाणवतो का, याची माहिती घेणार आहेत.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
००००