लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्चपासून शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या शोधमोहिमेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली असता, या मोहिमेस कोणत्याही प्रकारे स्थगिती देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी स्पष्ट केले.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतर करीत असल्याने ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे दि. १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्याशी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली. परंतु, या मोहिमेस स्थगिती मिळणार नसून, काही ठिकाणी अडचण असल्यास १२ मार्चपर्यंत शोधमोहीम राबवा, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस स्थगिती नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:17 PM