वाशिम - यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीवरून स्पष्ट होत आहे. वाशिम येथे गत १५ दिवसांपूर्वी होत असलेली ६ हजार क्विंटलची आवक आता ४ हजारांवर आली आहे, तर कारंजातही १० हजारांवरून सहा हजारांवर आवक घटली आहे.
यंदा वाशिम जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु अपु-या पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले होते. शासनाने नाफेडसाठी सोयाबीन खरेदी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता व्यापारी आणि नाफेडच्या खरेदीत कोणताच फरक दिसत नाही. नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन चाळणी करून आणि ओलावा तपासून खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे वजन आणि भावात घट होतेच आहे. तर बाजारात व्यापारी माल पाहून लिलावात बोली बोलत असल्याने भाव कमीच मिळतात. त्यामुळे शासनाकडून आधीच कमी ठरविण्यात आलेल्या ३०५० रुपये प्रति क्विंटल हमीभावाचाही काहीच फायदा शेतकºयांना होत नाही. तथापि, सुरुवातीला खरीपातील घेणीदेणी आणि रब्बीच्या तयारीसाठी शेतकºयांनी सोयाबीन विकले; परंतु आता मात्र शेतकºयांना सोयाबीनमध्ये भाववाढ होण्याची अपेक्षा असल्याने अनेक शेतकºयांनी सोयाबीन विक्री थांबविली आहे. नाफेडच्या केंद्रावरही एफएक्यू दर्जाचे सोयाबीन हमीभावात विक ण्यात शेतकºयांना उत्साह दिसत नाही. बाजारातील आवक कमी होत असल्याचे पाहून व्यापाºयांनी या शेतमालाच्या दरात किंचित वाढही केली आहे. पूर्वी २३५० ते २६५० रुपये प्रति क्विंटल खरेदी के ले जाणारे चागल्या दर्जाचे सोयाबीन आता २९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा उरलेला नाही आणि हलक्या दर्जाचेही सोयाबीन आता उरलेले नाही. त्यामुळे व्यापाºयांकडून दरवाढ करण्यात येत असली तरी ती शेतकºयांना पुरेशी वाटतच नाही. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक घटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाफेडकडील नोंदणीलाही प्रतिसाद नाही
यंदा नाफेडच्या खरेदीसाठी प्रशासनाकडून शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करून घेण्यात आली. जिल्ह्यातील सहाही केंद्रांवर या अंतर्गत हजारो शेतक-यांनी नोंदणीही केली. आता त्यामधील शेतक-यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सोयाबीन आणण्याची सूचना दिली जात आहे; परंतु त्यालाही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वाशिम येथील नाफेडच्या केंद्रावर शुक्रवारी नोंदणी झालेल्या ३० शेतकºयांशी सोयाबीन घेऊन येण्यासाठी संबंधित प्रशासनाने संपर्क साधला; परंतु त्यामधील केवळ दोन शेतकरी प्रत्यक्ष सोयाबीन विक्रीसाठी नाफेडच्या कें द्रावर दाखल झाले. हीच स्थिती मंगरुळपीर, मानोरा, कारंजा या ठिकाणीही असल्याचे समजते. त्यामुळे नाफेडकडेही सोयाबीन विकण्यात शेतकरी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.