- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : ज्याठिकाणी मृत्यूनंतर मानवी देहावर अंतीम संस्कार केले जातात, त्याच बहुतांश स्मशानभूमींमध्ये नागरिकांना बसण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली जात नाही. शिरपूर या गावातील स्मशानभूमीही त्यास अपवाद नव्हती. ही बाब लक्षात घेऊन एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या आजीच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमात अनाठाई खर्च न करता तिचीच अंतीम इच्छा पूर्ण करित स्मशानभूमीमध्ये सिमेंटचे १० बेंच बसवून आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांच्या या पुढाकाराचे गावातून स्वागत झाले.शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज शंकरराव देशमुख यांच्या आजीचे गतवर्षी फेब्रूवारी महिन्यात निधन झाले. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची किमान चांगली व्यवस्था असावी, ही त्यांच्या आजीची मृत्यूपुर्वी शेवटची इच्छा होती. त्याचा आदर राखत पंकज देशमुख यांनी वर्षश्राद्धच्या कार्यक्रमावर होणारा खर्च टाळून स्थानिक रिसोड फाटा परिसरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये सिमेंट-काँक्रीटचे १० बेंच बसवून आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे गावातून सर्वत्र कौतुक झाले.
टिनांच्या शेडची तुटफूटशिरपूर परिसरातील अनेक गावांमधील स्मशानभूमींची पुरती दुरवस्था झालेली आहे. काही स्मशानभूमींमध्ये ज्याठिकाणी मृतदेहाला चिताग्नी दिला जातो, तेथील टिनांच्या शेडची तुटफूट झाली असून देखभाल-दुरूस्तीअभावी हा प्रश्न अनेक वर्षांपासून तसाच रेंगाळत आहे. बसण्याची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्काराचा विधी उरकेपर्यंत नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.