लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील खातेधारकांच्या संगणकीकृत सातबारामधील काही प्रमाणात शिल्लक असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी ‘सात-बारा आपल्या दारी’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या चावडी वाचन मोहिमेंतर्गत ‘सात-बारा आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रत्येक खातेधारकाला संगणकीकृत सात-बाराची प्रत घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच १५ मे ते १५ जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित गावांचे तलाठी संगणकीकृत सात-बाराचे चावडी वाचन करतील. यामध्ये ज्या सात-बारामध्ये त्रुटी आढळून येतील त्यांची दुरुस्ती संबंधित तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे.ग्रामसभेमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तालुकास्तरीय एक नोडल अधिकारी चावडी वाचनाकरिता उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात खातेधारकांनी जागृत राहून आपला संगणकीकृत सात-बारामध्ये असलेल्या चुकांची दुरुस्ती करुन घेणे गरजेचे आहे. याबाबत सर्व संबंधिताना सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.चावडी वाचन मोहिमेंतर्गत सात-बारा आपल्या दारी, उपक्रम शेतकऱ्यांच्य हिताचा असून, सात-बारातील चुका दुरुस्ती करुन त्या घरपोच पोहोचविण्यात येणार आहेत. याचा खातेदारांनी लाभ घ्यावा-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम.
जिल्ह्यात ‘सातबारा आपल्या दारी’ उपक्रमास प्रारंभ
By admin | Published: May 16, 2017 1:49 AM