कोरोना बाधितांना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्यास व घरी राहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्यास त्यांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, या बाधितांनी गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असते. जिल्ह्यात गृह विलगीकरणात राहणाऱ्या बाधितांकडून या नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती सोपविण्यात आली आहे, तर शहरी भागात यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारीही गृहभेटी देऊन याबाबतची माहिती घेतात. भामदेवी येथेही काही कोरोनाबाधित व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या बाधितांकडून नियमांचे पालन होत आहे का, याबाबत ग्रामस्तरीय समितीमार्फत तपासणी केली जात असताना एक बाधित व्यक्ती गृहविलगीकरणाचे नियम मोडून घराबाहेर पडल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्तरीय समितीच्यावतीने ग्राम विकास अधिकारी यांनी सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----------
ग्रामस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यात पहिलाच गुन्हा
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी
शण्मुगराजन एस. यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, गृह विलगीकरणातील कोरोना बाधितांकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करणे, गावात कोरोना चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करण्याची जबाबदारी या समितीमार्फत पार पाडली जात. या भामदेवी येथील व्यक्तीवर समितीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून समितीमार्फत दाखल करण्यात आलेला जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे, अशी माहिती कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कालिदास तापी यांनी दिली.