लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्या गणरायाला दुसर्या टप्प्यात बुधवारी मंगरूळपीर, मानोरा, मालेगावसह ग्रामीण भागात भावपूर्ण निरोप देण्यात आला. मालेगाव : मालेगाव शहरातील श्री विसर्जन मिरवणुकीला ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. रात्री ११ वाजेपर्यंत श्री विसर्जन पार पडले. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील २२ गावांत श्री विसर्जन पार पडले. सकाळी श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. मंगरूळपीर : मंगरुळपीर येथे ६ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सात मंडळांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम मानाचा गणपती म्हणून तालुक्यात स्थान असलेल्या बिरबलनाथ संस्थान आवारातील बिरबलनाथ गणेश मंडळाच्या मूर्तीचे पूजन उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.मानोरा : शहरातील सात सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने विसर्जन मिरवणूक पार पडली. भाविकांनी गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. ६ सप्टेंबर रोजी ‘श्रीं’ची आरती करून विसर्जनाकरिता सातही सार्वजनिक गणेश मंडळ दिग्रस चौकात एकत्र आले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी अनसिंग येथे गणेश विसर्जन पार पडणार आहे.
दुसर्या टप्प्यात मालेगाव, मानोरा मंगरूळपीरमध्ये गणेश विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:28 AM