वाशिम : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजलाचा पुरवठा व्हावा व विशेष पाणी टंचाईतून त्यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ५00 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या जलस्वराज्य योजनेच्या दुसर्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हयाच्या समावेश करण्यात आला. तथापि, जलस्वराज्य योजनेचा पहिला टप्पा राबविलेल्या वाशिम जिल्हयाचा या योनजेत समावेश न करुन खो देण्यात आला आहे.यामुळे जिल्हयातील ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली गावे ती सुविधा होण्यापासून वंचित राहणार आहेत. जलस्वराज्य योजनेच्या सन २00४ ते २0११ दरम्यान राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्यात जिल्हयातील १0५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली.त्या टप्प्यात लहान-मोठी गावे घेऊन स्थानिक पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत कामे करून घेण्यात आली.त्याचा या गावामधील हजारो लोकांना लाभ मिळाला. आता जलस्वराज्य योजनेच्या दुसर्या टप्यात ५00 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टंचाईग्रस्त गावे व वाडया(वस्त्या)करिता टंचाई कालावधीसाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. योजनेच्या दुसर्या टप्प्यात राज्यातील रायगड, रत्नागिरी पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर व चंद्रपूर या १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. सदर टप्प्यासाठी निवड झालेल्या राज्यातील १२ जिल्ह्यामधील मागील तीन वर्षात टंचाईस्थिती असणार्या व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आलेल्या व इतर कोणत्याही स्वरुपाची नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित नसलेल्या गावांमध्ये योजनेची कामे केली जाणार आहेत. वाशिम जिल्हयात ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची १२८ गावे आहेत त्यापैकी कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली तब्बल ९१ गावे आहेत. त्यापैकी अनेक गावातील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळयात गावातील विहिरी आटल्यामुळे दुरवरच्या विहिरींवरुन पाणी आणावे लागते. या टप्प्यात जिल्हयाचा समावेश झाला असता तर या गावांना योजनेचा लाभ मिळून तेथील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली असती.
जलस्वराज्यच्या दुसर्या टप्प्यात वाशिम जिल्ह्याला ‘खो’
By admin | Published: June 05, 2014 11:27 PM