वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातही चांगलेच हातपाय पसरले असले तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. दुसरी लाट ओसरत असली तरी यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा मनोदय ग्रामपंचायतींनी व्यक्त केला.
देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ग्रामीण भागात आढळला होता. पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील जनजीवन फारसे प्रभावित झाले नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ७१४३ रुग्ण आढळून आले तर १५४ जणांचा मृृत्यू झाला. फेब्रुवारी २०२१ च्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात दुसरी लाट आली आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. मार्च ते मे या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यात ७९० च्या आसपास गावे असून १५ गावांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. कारंजा तालुक्यातील जामठी, मजलापूर, शिंगणापूर, जलालपूर, वाहितखेड, रिसोड तालुक्यातील जायखेड, सरपखेड, मोरगव्हाण, वाशिम तालुक्यातील भोयता, मानोरा तालुक्यातील डोंगरगाव, मंगरूळपीर तालुक्यातील खरबी, अंबापूर, खेर्डा खु., एकांबा, रुई आदी १५ गावांनी कोरोना वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, गावकऱ्यांचे सहकार्य, परजिल्हा, परगावावरून आलेल्या नागरिकांची गावाबाहेरच तपासणी, नियमित निर्जंतुकीकरण, कोरोनाबाधित गावांतील नागरिकांचा थेट संपर्क टाळणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर, कोरोना लसीकरण, आरोग्य विभागासह तालुका, जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी मार्गदर्शन या बळावर हे शक्य झाले आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, आवश्यक ती दक्षता घेण्याचा मनोदय १५ गावांनी व्यक्त केला.
००००
कोरोनाला वेशीवर रोखणारी तालुकानिहाय गावे
तालुकागावे
वाशिम ०१
मालेगाव ००
कारंजा ०५
मानोरा ०१
रिसोड ०३
मंगरूळपीर ०५
०००००००
बॉक्स
लसीकरणावर भर !
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लस हा कोरोनावर प्रभावी उपाय असल्याने प्रत्येक पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने केले आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करावे, असे आवाहनही जिल्हा परिषद प्रशासनाने केले.
०००००
एकूण रुग्ण ४११३२
सक्रिय रुग्ण ५१७
कोरोनावर मात ४००१२
एकूण मृत्यू ६०२