वाशिम: सेक्युरा कोविड हॉस्पिटल येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले गेल्याचे निष्पन्न झाल्याने १४९ रुग्णांकडून घेण्यात आलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला. त्यानुसार ३ फेब्रुवारीपर्यंत १०४ रुग्णांना अतिरिक्त शुल्क परत केले असून, उर्वरित ४५ रुग्णांचे धनादेश संबंधितांनी प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. संंबंधित रुग्णांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. याठिकाणी उपचार घेतलेल्या १४९ कोरोना बाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाच्या अहवालात निष्पन्न झाले. त्यामुळे अतिरिक्त शुल्काची रक्कम संबंधितांना सव्याज परत करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला होता. त्यानुसार ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०४ रुग्णांनी आपले धनादेश प्राप्त करून घेतले आहेत. मात्र, उर्वरित ४५ रुग्णांचे धनादेश अजूनही घेवून जाणे बाकी आहे. संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. या यादीमध्ये नाव असल्यास संबंधित रकमेचे धनादेश डॉ. सचिन पवार यांचे हॉस्पिटल, जुनी जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने सोमवारी केले आहे.
सेक्युरा हॉस्पिटलकडून १०४ रुग्णांचे अतिरिक्त शुल्क परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:24 PM