लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : ‘डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून परवानगी मिळालेल्या येथील सेक्युरा हॉस्पिटलने १४९ रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेतले. प्रशासनाच्या आदेशानंतर त्यातील १०८ रुग्णांना धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. तर ४१ लोकांचे पैसे अद्याप प्रलंबित आहेत. असे असतानाच भरारी पथकाने पुन्हा केलेल्या चौकशीत आणखी ५८ रुग्णांकडून ४.३३ लाखांचे अतिरिक्त शुल्क आकारल्याचे निष्पन्न झाले असून ते पैसेही ‘सेक्युरा’ला संबंधित कोविड रुग्णांना परत करावे लागणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर निश्चित करून दिले आहेत. मात्र, सेक्युरा हॉस्पिटल येथे कोविड बाधित रुग्णांवर उपचाराचे देयक वाजवी शुल्कापेक्षा अधिक दराने आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने सेक्युरा हॉस्पिटल येथे भरती असलेल्या व उपचार घेऊन घरी परतलेल्या सर्व कोविड बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी केली. पथकाच्या अहवालावरून १४९ रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त दराने देयक आकारणी झाल्याचे दिसून आले. ही रक्कम १० लाख ४८ हजार ७३ रुपये एवढी होती. दरम्यान, ‘सेक्युरा’ने १४९ पैकी १०८ रुग्णांना धनादेशाद्वारे अतिरिक्त दराने आकारलेली रक्कम अदा केली असून त्यातील ४१ रुग्णांना पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.अशातच भरारी पथकाने इतर कोविड बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी केली असता आणखीन ५८ रुग्णांसोबतही असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधितांना अतिरिक्त दराने आकारलेली ४ लाख ३३ हजार ५७ रुपये एवढी रक्कम सेक्युरा हॉस्पिटलला परत करावी लागणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार कैलास देवळे यांनी दिली.(प्रतिनिधी)
‘सेक्युरा ’ला आणखी ५८ कोविड रुग्णांचे पैसे करावे लागणार परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 11:45 AM