खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग आला असून शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आगामी पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पेरणीपूर्व कोणती दक्षता घ्यावी यासाठी उमेद अभियान वाशिमअंतर्गत उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, मालेगाव तालुका व्यवस्थापक अखिल शेख, गणेश खोलगडे, आतिश राठोड, विजय उगले यांच्या मार्गदर्शनात महिला स्वयंसाहाय्यता समूहाच्या माध्यमातून कोरोनाचे नियम पाळून शेतकर्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून ‘उमेद’च्या मीना गोंडाळ, प्रतिभा घुगे, व विजया पटोकार यांनी महिला स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांना बियाणे उगवणशक्ती व बीजप्रक्रियेबाबत प्रात्यक्षिक दाखविले. बियाणांची उगवण शक्ती ७० टक्केच्या जवळपास वा त्यापेक्षा जास्त असल्यास घरचेच बियाणे पेरणी करण्याचे आवाहन केले.
यावेळी कृषिसखी रेखा खुरसडे, बॅकसखी संगीता नालिंदे, पशुसखी मीना हवा, सीआरपी बबिता ढवळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.