वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी या हंगामाची तयारी केली असून, दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानेही (महाबीज) खरीप बीजोत्पादन कार्यक्रमाची आखणी केली आहे. यंदा १२१०० हेक्टरवर बीजोत्पादनाची आरक्षण योजना असून, शेतकऱ्यांना यात सहभागी होण्यासाठी २० मे ही अंतिम मुदत आहे.
वाशिम जिल्ह्यात महाबीजकडून दरवर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात बीजोत्पादन प्रकल्प राबविण्यात येतो. खरीप हंगामात तूर, ज्वारी, उडीद, सोयाबीन, आदी पिकांचे बीजोत्पादन महाबीजकडून केले जाते. यंदाही या बीजोत्पादन कार्यक्रमाची आखणी महाबीजने केली आहे. यामध्ये १२१०० हेक्टर क्षेत्रावर तूर, ज्वारी, उडीद, सोयाबीन बीजोत्पादन बियाण्याचे आरक्षण २० मे पर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी २० मे पूर्वी महाबीज जिल्हा व्यवस्थापक, क्षेत्र व्यवस्थापक यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन महाबीजकडून करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, ३ महिन्यातील सातबारा किंवा ८ अ ची प्रत मागणी अर्जासोबत जोडावी लागणार आहे.
-----------------
कोट:
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोलाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम जिल्ह्यात बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यात १२१०० हेक्टरवर सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, ज्यूट या पिकांच्या बीजोत्पादनाची आरक्षण योजना २० मेपर्यंत राबविली जात आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत मागणी अर्ज करून यात सहभागी व्हावे.
- डॉ. प्रशांत घावडे
जिल्हा व्यवस्थापक,
महाबीज वाशिम.